Short Circuit Fire – खेड तालुक्यातील पाईट करंडेवस्ती (पॉलिहाऊस) येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून 11 हजार कडब्याच्या पेंड्या जळून खाक झाल्या. या आगीत शेतकरी गुलाब रघुनाथ पिंजण यांचे सुमारे 4 लाख 40 हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा सुरू असताना महावितरणच्या विद्युत तारांमध्ये स्पार्किंग झाले. त्यातून पडलेल्या ठिणग्यांमुळे शेतातील कडब्याच्या वैरणीला आग लागली. काही क्षणांतच आग भडकली आणि चार मोठ्या वळह्यांमध्ये साठवून ठेवलेल्या तब्बल 11 हजार कडब्याच्या पेंड्या जळून खाक झाल्या. हा चारा शेतकरी गुलाब पिंजण यांनी पावसाळ्यातील दुधाळ जनावरे तसेच बैलगाडा शर्यतीतील बैलांसाठी काळजीपूर्वक साठवून ठेवला होता. हा चारा त्यांनी 4 हजार रुपये शेकडा दराने खरेदी केला होता. आगीत वर्षभरासाठीचा जनावरांचा चारा नष्ट झाल्याने शेतकरी कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी तातडीने महावितरण, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलिस प्रशासनाला कळवून घटनास्थळी पंचनामा करण्याची मागणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यास त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी पाईट पोलीस चौकीचे अधिकारी कैलास चासकर, भास्कर रघतवान, महावितरणचे शाखा अधिकारी अजय पोकळे, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रशांत वावळे, कलीम शेख, सूरज राळे, सतीश काळे आदी उपस्थित होते.