पुण्यात गणेशोत्सवासाठी खरेदीची धूम

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -गणपती बाप्पाचे आगमनाला अवघे चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू आहे. खरेदीसाठी मंडई, तुळशीबाग परिसरात शनिवारी प्रचंड गर्दी झाली होती. शहर तसेच उपनगरातून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी आल्याचे दिसून आले.
गणेशोत्सवातील सजावट तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मंडई, तुळशीबाग परिसरात गर्दी केली होती. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता तसेच मध्यभागातील गल्ली बोळातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्यभागात खरेदीसाठी अनेक जण मोटारीतून आले होते. मोटारींमुळे वाहतूक कोंडीत भर पडली. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मंडई परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याच्या पाहायला मिळाले.
मध्यभागात वाहतूक कोंडी
रविवार पेठेतील कापडगंज, बोहरी आळी परिसरात सजावट साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. मंडई परिसरातील वाहनतळावर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने अनेकांनी नदीपात्रातील रस्त्यावर वाहने उभी केली होती. सदाशिव पेठ, नारायण पेठेतील गल्ली बोळात बेशिस्तपणे दुचाकी लावण्यात आल्याने गल्ली बोळातील वाहतूक विस्कळीत झाली. कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.
मंदिर परिसरात तपासणी
पोलिसांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात घातपातविरोधी तपासणी केली. बॉंब शोधक नाशक पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रंगीत तालीम घेतली. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतूक शनिवारी दुपारी काही काळ विस्कळीत झाली.





