वेबसाईटची खातरजमा करूनच ऑनलाईन खरेदी करा

महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन
मुंबई – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात आतापर्यंत ३३३ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे व नागरिक ऑनलाईन शॉपिंग करत असल्यामुळे, इंटरनेटवर अनेक संकेतस्थळ (website) सुरु झाल्या आहेत ज्या आपण परदेशातील महागड्या ब्रँड्सचे वितरक आहोत अशा आशयाचा दावा आपल्या संकेतस्थळावर (website)जाहीरपणे करतात.
महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, अशा लिंक्सवरून काही खरेदी करताना सावध रहा, सायबर भामट्यांनी फसविण्यासाठी तयार केलेली ती नकली (fake) वेबसाईटसुद्धा असू शकते. कृपया अशी एखादी वेबसाईट तुमच्या पाहण्यात आली तर आधी खातरजमा करून घ्या. मगच त्यावर ऑनलाईन खरेदी करा व कुठेही आपल्या बँक खात्याची सर्व माहिती तसेच डेबिट/ क्रेडिट कार्ड पिन नंबर देऊ नका. सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





