प्रभात वृत्तसेवा पुणे – महिन्यात दोन खून करून वेगवेगळ्या शहरांमध्ये लपण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीचा रक्तरंजित प्रवास अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी थांबवला. गेल्या महिन्यात जामखेड येथे खून करून पुणे जिल्ह्यात आलेल्या या आरोपीने सासवडमध्ये दुसरी हत्या केली. त्यानंतर तो पसार झाला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने या दुहेरी खुनांचा पर्दाफाश केला. ९ डिसेंबर रोजी सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकामाच्या इमारतीत जिन्याखाली राजू दत्तात्रय बोराडे (३८, रा. सासवड, ता. पुरंदर) यांचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याने या घटनेने सासवड हादरून गेले.मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर सासवड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या. पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मृत व्यक्तीसोबत दोन अनोळखी व्यक्ती घटनास्थळाकडे जात असल्याचे स्पष्ट झाले. याच फुटेजमधून तपासाची दिशा ठरली. संशयितांचा शोध घेण्यासाठी कोंढवा, हडपसरसह विविध भागांत पथके रवाना करण्यात आली. दरम्यान, सासवडमधील आनंद वाईन्स येथे दारू खरेदीसाठी आलेला एक संशयित इसम पोलिसांच्या नजरेत आला. चौकशीत त्याने सूरज प्रकाश बलराम निषाद असे नाव सांगितले; मात्र त्याची उत्तरे विसंगत होती. सखोल चौकशीत निषाद याने साथीदार नीरज गोस्वामी याच्यासह खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर गोस्वामी यालाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपी दारूच्या नशेत असताना वाद वाढत गेले आणि त्यातूनच त्यांनी हा खून केल्याचे समोर आले आहे.चौकशीदरम्यान गोस्वामी याने काही आठवड्यांपूर्वीच जामखेड येथे पैशांच्या वादातून विकास मधुकर अंधारे (२२) याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्या घटनेनंतर तो पुणे जिल्ह्यात कामाच्या शोधात आला आणि सासवडमध्ये दारूच्या वादातून दुसर्या खुनाची घटना घडवून आणली. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी पकडले. पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक निरीक्षक वैभव सोनवणे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.