धक्कादायक : घराच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावाला पेट्रोल ओतून पेटविले

जळोची : घराच्या वादातून तू वेगळा रहा, आमच्यात राहू नको. या कारणावरून झालेल्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावाला पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी येथे घडला. याप्रकरणी दि.१२ ऑगस्ट रोजी मारुती वसंत भोंडवे (वय 40) यांनी फिर्याद दिली होती. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, मयत मारुती भोंडवे व त्यांची पत्नी, दोन मुले पत्र्याच्या घरात असताना आरोपी अनिल वसंत भोंडवे (वय 32) हा मयत मारुती भोंडवे यांना म्हणाला की, तू वेगळे रहा आमच्यात राहू नको या कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.
दरम्यान फिर्यादीच्या अंगावरील पेटते कपडे विझवत असताना फिर्यादीच्या पत्नीलाही ठिकठिकाणी भाजले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर घटनेचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहे.





