इंदौर – अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. भैय्यू महाराज यांच्या गाडीवरील ड्रायव्हर कैलाश पाटील याने फेरचौकशीत नवीन माहिती दिली आहे. भैय्यू महाराज यांच्या मृत्यूला आता दोन वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे.
भैय्यू महाराजांच्या गाडीत जीपीएस सिस्टम लावलेली होती असा गौप्यस्फोट कैलाश पाटीलने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यामाध्यमातून गाडी कुठं-कुठं जाते याची माहिती घेण्यात येत होते. गाडीत महाराजांसोबत जाणाऱ्या सेवेकऱ्याला महाराजांची पत्नी आयुषी पुन्हा-पुन्हा एकाच गोष्ट विचारत असे, की त्यांच्यासोबत कोण-कोण आहे.
या प्रकरणात फिर्यादीच्या वकिलाने ड्रायव्हर कैलाशला पुन्हा साक्ष नोंदविण्यासाठी बोलविण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या प्रकरणाची १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. महाराजांचा सेवक शेखर याला देखील याच दिवशी बोलविण्यात आलं आहे. या प्रकरणात आतार्यंत २५ जाणांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सहा महिन्यात संपविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सुनावणी वेगात होत आहे. शुक्रवारी महाराजांचा ड्रायव्हर कैलाश याने सांगितले की, आयुषी आणि कुहू यांच्यात सतत भांडण होत होती. त्यामुळे महाराज तणावात होते. तसेच आरोपी विनायक आणि शरद महाराजांचे विश्वासू सेवक होते. घटनेच्या ३ महिन्यांपूर्वीच महाराजांनी मला कुहूच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून पुण्याला पाठवून दिलं होतं, असंही कैलाशने सांगितलं.
दरम्यान पाटीलने फेरतपासणीत हेही सांगितलं की, सानिया सिंह नावाची एक मॉडेल अभिनेत्री महाराजांना भेटण्यासाठी इंदोरला येत होती. तिच्यासाठी जेवन महाराजांच्या घरून गुपचूप पाठविण्यात येत होते. महाराजांच्या गाडीला जीपीएस सिस्टीम लावण्यात आली होती. यामुळे गाडीवर नजर ठेवण्यात येत होती. तसेच महाराजांची पत्नी आयुषी गाडीत असलेल्या सेवकांना सतत हेच विचारत असे की, सोबत आणखी कोण आहे, अशी माहितीही कैलाशने दिली.
याव्यतिरिक्त कैलाशने सांगितलं की, महाराष्ट्राच्या एका संस्थेवर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतो. या संस्थेची प्रमुख वर्षा नावाची माहिला असून या महिलेने मुलताई येथे शेकडो एकर जमीन खरेदी केली होती. हा सौदा कऱण्यात महाराजांच्या जवळचे लोक सामील होते, असंही कैलाशने कोर्टात सांगितलं.
भैय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या केली होती. महाराजांचे तीन सेवेकरी विनायक, पलक आणि शरदला पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपींच्या बाजूनं ज्येष्ठ वकील अविनाश सिरपूरकर, वकील धर्मेद्र गुर्जर आणि वकील आशीष चौरे बाजू मांडत आहेत. फिर्यादीची बाजू सरकारी वकील विमल मिश्रा आणि एजीपी गजराजसिंह सोळंकी मांडत आहेत.