प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र अँटी टेररिझम स्क्वॉड (एटीएस) ने पुण्यात अटक केलेल्या ३५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर झुबेर हंगरेकरच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याचा दावा केला आहे.त्याला २७ ऑक्टोबर रोजी पुणे रेल्वे स्थानकातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर तपास यंत्रणेने त्याचा लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करून डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू केली. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हांगरगेकरने ९/११ दहशतवादी हल्ल्यांसह अनेक जागतिक मोठ्या दहशतवादी कारवायांचा सखोल अभ्यास केला होता, तसेच मध्यपूर्व अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील अतिरेकी गट व विचारवंतांचे साहित्य त्याने मोठ्या प्रमाणात संग्रहित करून वाचले असल्याची माहितीही दिली आहे. प्राथमिक तपासात अल-कायदा व एक्यूआयएस यांची अनेक डिजिटल मासिके, जिहादचे गौरवीकरण करणारे लेख, आईडी स्फोटक बनवण्याबाबत मार्गदर्शक माहिती, लोन-वुल्फ हल्ल्यांची पद्धत, गुरिल्ला शैलीतील कारवायांचे तपशील, असे उच्च पातळीचे कट्टरवादी साहित्य मोठ्या प्रमाणात आढळल्याचा एटीएसचा दावा आहे. एटीएस हंगरगेकरच्या संभाव्य नेटवर्क, संपर्कातून झालेला डिजिटल संवाद, तसेच त्याच्याकडील जप्त सामग्रीचा उद्देश याबाबत आणखी तपास करीत आहे.