Pune Crime News : धक्कादायक! अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात थेट पोलिसाचाच सहभाग, पोलीस आयुक्तांचा NDPS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश

पुणे : 22 सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या कारवाईत तब्बल ५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला कर्मचारी नवनाथ शिंदे याचा या अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात थेट सहभाग असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नवनाथ शिंदे हा केवळ संरक्षण देत नव्हता तर तो गांजाच्या व्यवहारात प्रत्यक्ष भागीदार होता, असेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या गंभीर उघडकीनंतर पोलीस आयुक्तांनी स्वतः हस्तक्षेप करत एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत शिंदेविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
घटनाक्रम कसा उलगडला?
सहकार नगर पोलीस ठाण्याने काही दिवसांपूर्वी एक विशेष मोहिम राबवून परिसरातील अंमली पदार्थांच्या व्यवहारावर धडक कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान मिळालेल्या माहितीवरून पुढील तपास सुरू करण्यात आला. तपासदरम्यान मिळालेल्या कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार आणि स्थानिक माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनंतर नवनाथ शिंदेचे नाव समोर आले.
पोलीस आयुक्तांची ठाम भूमिका
या प्रकरणी कारवाई करताना पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, “गुन्हेगारी कृत्यांमध्ये कोणताही पोलीस कर्मचारी सहभागी असल्यास त्याच्यावर कायद्याप्रमाणे कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांच्या वर्दीत लपून बसलेल्या गुन्हेगारांना अजिबातही पाठीशी घालणार नाही.”
पुढील कारवाई काय?
नवनाथ शिंदेविरोधात NDPS कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याच्या अटकसत्राला सुरुवात झाली आहे. याशिवाय या प्रकरणात आणखी कोणते अधिकारी किंवा स्थानिक पातळीवरील व्यक्ती सामील आहेत का, याचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असले तरी भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे





