Crime News : धक्कादायक ! रानडुक्कर समजून सहकाऱ्यावरच झाडली गोळी; पालघरमधील घटना

मुंबई : जंगलात अवैधरीत्या शिकारीसाठी गेले असता चुकून बंदुकीचे ट्रिगर दबल्याने ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रमेश जाण्या वरठा असे मृताचे नाव असून यात एक जण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री पालघर जिल्ह्यात घडली असून पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रमेश जाण्या वरठा व त्याचे इतर सहकारी बारशेती येथील जंगलात रात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गेले होते. या वेळी थोडा आवाज झाल्याने रानडुक्कर आल्याचे समजून एकाने चुकून बंदुकीचे ट्रिगर दाबले. त्यानंतर गोळी सुटून रमेश याला लागली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटना घडल्यानंतर मृतदेह जंगलातच सोडून सर्वजण पसार झाले.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर तपास करून ६ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिस तपास करत आहेत. बोरशेरीच्या जंगलात अलन डोंगराच्या पायथ्याशी पट्टेरी वाघ आणि २०० किलो वजनापेक्षाही अधिक वजनाची रानडुकरे पाणी पिण्यासाठी येत असल्याचे शिकाऱ्यांना माहीत होते.
काही जण या प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलातील झाडांवर बसले होते. गटातील काही सहकारी उशिरा आल्याने तसेच मोबाइलचा टॉर्च बॅटरी ही सुरू केली नसल्याने प्राणी येत असल्याचा संशय आल्याने एकाने गोळी झाली. यात वरठाचा मृत्यू झाला.





