प्रभात वृत्तसेवा पुणे – बुधवार पेठेत एका विवाहित तरुणीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. संबंधित तरुणी काही वर्षांपूर्वी इमारतीत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. तिची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नाही.तरुणीने टेरेसवर जाऊन इमारतीच्या मध्य भागात उडी मारल्याने ती जागेवरच मृत पावली. आवाज आल्याने रहिवाशांनी पाहिले असता, तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. दरम्यान, विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही विद्यार्थिनींकडे चौकशी केली असता, संंबंधित तरुणी काही वर्षांपूर्वी याच इमारतीत राहून स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती, अशी माहिती मिळाली. तिच्याजवळ एक मोबाइल सापडला असून, पोलीस त्याआधारे ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी सांगितले, की संबंधित तरुणी येथे राहून गेल्याने तिला टेरेस उघडे असल्याची माहिती होती. ती विवाहित आहे. मात्र, सध्या ती कोठे राहते, याची माहिती कोणालाच नाही.