Nevasa : धक्कादायक! बिबट्याचा घरात घुसून महिलेवर हल्ला; एक ठार, दोन जखमी
Nevasa : या हल्ल्यात महिलेच्या कंबरेला, डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमी महिलेला ग्रामस्थांनी प्राथमिक उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले आहे.

नेवासे : भालगाव – गोधेगाव परिसरात बिबट्याने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. गेल्या पंधरा दिवसांत एकाचा बळी गेल्यानंतरही आणि दोन जणांवर जीवघेणे हल्ले झाल्यानंतरही बिबट्याची दहशत कमी झालेली नाही. गुरुवारी (दि.५) पहाटे तर बिबट्याने थेट घरात घुसून महिलेवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आणखी गडद झाले आहे.ही पंधरा दिवसांतील तिसरी घटना आहे.
मध्यरात्रीपासून वस्तीभोवती फिरत होता बिबट्या
नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथील पल्हारे वस्तीवर पहाटे सुमारे ४:१५ वाजण्याच्या दरम्यान घरात झोपलेल्या कुसुम हिरामण पल्हारे (वय ६१) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला रात्री बारा वाजल्यापासूनच बिबट्या पल्हारे यांच्या वस्तीभोवती फिरत होता. घराशेजारी असलेल्या कांदा चाळीतही तो फिरताना ग्रामस्थांनी पाहिले. बारा वाजल्यापासून परिसरातील नागरिक बिबट्याला बघत होते. नागरिकांसमोरच बिबट्याने कुत्र्याला फस्त केले. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लाईट गेल्यावर बिबट्याने घरात झोपलेल्या महिलेवर हल्ला केला.
या हल्ल्यात महिलेच्या कंबरेला, डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमी महिलेला ग्रामस्थांनी प्राथमिक उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले आहे.
रात्री बारापासून फोन करूनही वनविभाग आलाच नाही!
वन अधिकाऱ्यांना रात्री बारापासून फोन करूनही ते वेळेवर न आल्यामुळे ही घटना घडली,असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वेळीच पथक आले असते तर महिलेवरील हल्ला टाळता आला असता,असे नागरिकांचे म्हणणे आहे.
१२ वर्षीय मुलावरही झाला होता हल्ला
यापूर्वी मंगळवारी (दि.२७ ऑक्टोबर) सकाळी पावणेसहा वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या १२ वर्षीय शिवराज रवींद्र शिंदे याच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. तो इतर १० ते १२ जणांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेला असता, ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि पायावर पंजे मारले. सुदैवाने सोबत असलेल्या सर्वांनी एकच आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली आणि या चिमुरड्याचे प्राण थोडक्यात बचावले. या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या.
शेतमजुराचा उसाच्या शेतात ओढून नेऊन घेतला बळी
तिळापूर, ता. राहुरी येथील मूळ रहिवासी असलेले शेतमजूर सुरेश अहिरे (भोऱ्या बाबा) हे गेल्या ३०-४० वर्षांपासून गोधेगाव येथील काशिनाथ औटे यांच्याकडे शेती काम करत होते. ते पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना बिबट्याने त्यांना उसाच्या शेतात ओढून नेऊन जीवे ठार केले होते. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती पसरली होती.
एक बिबट्या जेरबंद, तरीही दहशत कायम
बिबट्याच्या हल्ल्यात एक ठार आणि आता तीन जखमी होऊनही वनविभागाने केवळ एक बिबट्या जेरबंद केला आहे. मात्र या परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याने दहशत कायम आहे. शेतात जाणे, सकाळी-संध्याकाळी घराबाहेर पडणेही ग्रामस्थांना अवघड झाले आहे.
ऊस तोडणी, कापूस वेचणीवर संकट
सध्या शेतकऱ्यांचे कापूस वेचणी तसेच ऊस तोडणीची कामे जोमात सुरू असताना बिबट्याच्या दहशतीमुळे ऊस तोडणी कामगार व मजूर परिसरात थांबायला तयार नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. मजूर पळून गेल्याने शेतमाल काढणी खोळंबली आहे.
आमदार लंघे यांची वनमंत्र्यांकडे धाव, तातडीच्या कारवाईचे आदेश
गोधेगाव परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मुंबई मंत्रालयात वनमंत्री ना. गणेश नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. याची तातडीने दखल घेत वनमंत्री नाईक यांनी अहिल्यानगर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) यांना तात्काळ फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ठोस कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत मात्र आदेश देऊनही प्रत्यक्षात बिबट्याची दहशत कायम असल्याने ग्रामस्थांमधून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या बिबट्याला तातडीने जेरबंद करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी गोधेगाव, भालगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.





