धक्कादायक ! लखीमपूर खेरी प्रकरण पूर्वनियोजित कट; विशेष पथकाची न्यायालयात माहिती

लखनौ – लखीमपूर खेरीत शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडून मारण्याची घटना हा पुर्वनियोजित आणि विचारपूर्वक आखलेला कट होता. हा नजरचुकीने अथवा अनवधानाने झालेला अपघात नव्हता, असे प्रतिपादन पोलिसांच्या विशेष पथकाने न्यायालयातील अर्जात केले आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषसह अन्य 13 आरोपींवर हत्येचा प्रयत्न यांसह अनेक नवीन कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही न्यायलयाकडे या अर्जाद्वारे केली आहे.
लखीमपूर खेरी येथे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमावावर गाडी घालून चार शेतकऱ्यांसह पाच जणांची हत्या केली होती. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे तीन कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या जमावाने केलेल्या मारहाणीत मरण पावले होते. केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा देण्याच्या मागणीने यानंतर जोर धरला होता, मिश्रा यांचा मुलगाच या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.
विशेष पथकाने न्यायलयाकडे सार्वजनिक ठिकाणी हयगयीने गाडी चालवून लोकांना दुखापत करणे, निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरणे या आरोपांऐवजी आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, दंगल उसळवणे, शस्त्रांचा वापर करून दंगल घडवणे असे आरोप दाखल करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, अटक झालेल्या मुलाच्या गुन्ह्यातील कलमांत वाढ झाल्याचे कळताच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा न्यायालयात पोहोचले. त्यांनी आपल्या मुलाला धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींना टाळत त्यांनी कारागृहातून निघून जाणे पसंत केले.
या तपासात विशेष तपास पथकाकडून होत असलेल्या हलगर्जी पणाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती, त्यांनी विशेष पथकाचा तपास दुसऱ्या राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या देखरेखी खाली करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तपासाची दिशा बदलल्याचे दिसून येत असल्याचे पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
आशिष मिश्रा, लवकुश, आशिष पांडे, शेखर भारती, अंकित दास, लतिफ, शिशुपाल, नंदनसिंह, सत्याम त्रिपाठी, सुमित जैस्वाल, धर्मेंद्र बंजारा, रिंकु राणा आणि अल्हास त्रिवेदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.





