Kalyan News : धक्कादायक ! कल्याणमध्ये तरुणाकडून बेछूट गोळीबार; एकाचा मृत्यू

कल्याण : सातत्याने होत असलेल्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे कल्याण चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर कल्याणच्या एका सोसायटीमध्ये मराठी-अमराठी कुटुंबाचा वाद होऊन हाणामारीही झाली.
हे प्रकरण ताजे असतानाच कल्याणमध्ये थेट रस्त्यावर बेछूट गोळीबाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्व येथील काटेमानिवलीच्या नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार झाला. यामध्ये रणजित दुबे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील जागेच्या वादावरून चुलत भावाकडूनच रणजित दुबेची हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला आणि आरोपी राम दुबे याला बेड्या ठोकून अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.





