ठाण्यातील रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार समोर; एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा बेजबाबदार पुन्हा एकदा समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील 13 रुग्ण हे आयसीयू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये होते. काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने, तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची या रुग्णालयातील स्थिती आहे. 10 ऑगस्टला देखील या रुग्णालयातील असाच प्रकार समोर आला होता. तेव्हा एकच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची पाहणी केली होता.
रुग्णालयात उपचार न मिळाल्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. यावेळी मृत रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापुर्वी देखील एकाच दिवशी जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. डॉक्टरांची अपुरी संख्या, अपुरी सामुग्री आदी कारणांमुळे या घटना घडत असल्याचे… https://t.co/Bo5XPJGodk
— Supriya Sule (@supriya_sule) August 13, 2023
या घटनेवर सुप्रिया सुळे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. “ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापुर्वी देखील एकाच दिवशी जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. डॉक्टरांची अपुरी संख्या, अपुरी सामुग्री आदी कारणांमुळे या घटना घडत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. याकडे मुख्यमंत्री, ठाणे महापालिका आणि आरोग्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष देऊन सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे,” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.





