Crime News : अघोरी कृत्याने खळबळ…! राजगड तालुक्यातील धक्कादायक प्रकार; आठवड्याभरात दुसऱ्यांदा करणीचे प्रकार समोर
राजगड : पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अघोरी प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. हिरपोडी-पाबे गावातील परिसरात अवघ्या आठवड्याभरात अशा स्वरूपाची दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गुरुवारी सकाळच्या सुमारास, गावातील एका शेतकऱ्याच्या लक्षात उंबराच्या झाडावर टांगलेले संशयास्पद साहित्य आलं. पाहणी केली असता, झाडाला दोन अज्ञात जोडप्यांचे तसेच एका अनोळखी कुटुंबाचे फोटो लिंबू, बिबवा व काळ्या बाहुलीसह खिळ्यांनी ठोकलेले होते. त्याचबरोबर झाडाभोवती लिंबांनी टाचण्या टोचलेल्या अवस्थेत आढळल्या. तसेच लाल कपड्यांमध्ये करणीचे साहित्य गुंडाळून लटकवलेले होते.
ही घटना समोर येताच गावात खळबळ उडाली. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच गावातील राईस मिलच्या मागे असणाऱ्या बाभळीच्या झाडावरही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी गावचे माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर आणि अन्य दोन नागरिकांचे फोटो अशाच रीतीने झाडाला ठोकलेले आढळून आले होते.
या घडामोडीमुळे गावातील नागरिक भयभीत असून, अघोरी कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यापूर्वी घडलेल्या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. मात्र, अशा घटना पुन्हा-पुन्हा घडत असल्याने पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
राजगड तालुक्यात अशा अघोरी प्रकारांनी वारंवार डोके वर काढल्याने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.





