प्रभात वृत्तसेवा लोणंद – पाडेगाव फार्म, ताम्हाणे वस्ती (ता. फलटण) येथे शेतजमिनीवरील सततच्या वादामुळे मानसिक त्रस्त झाल्याने 60 वर्षीय काशिनाथ साधू ताम्हाणे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमनाथ ज्ञानदेव ताम्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमनाथ ताम्हाणे यांनी यांनी गेले पाच-सहा वर्षे त्यांच्या वडिलांच्या शेतातील बांध वारंवार फोडणे, पाणी घालणे आणि सतत त्रास देणे असे प्रकार केले. या मानसिक छळाला कंटाळून काशिनाथ ताम्हाणे यांनी 30 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 2.40 वाजता कीटकनाशक प्राशन करून जीव देण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दि. ६ रोजी त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.यानंतर कीर्ती सागर राऊत (वय 35) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सोमनाथ ज्ञानदेव ताम्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेची नोंद 6 डिसेंबर रोजी रात्री 9.25 वाजता करण्यात आली. घटनास्थळाला सपोनी भोसले यांनी भेट दिली. पोउपनि हेगडे तपास करत आहेत.