पुणे – विहिरीजवळ पार्किंग कॉलमलगत अचानक जमीन खचली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या गिरीजाशंकर विहार सोसायटी परिसरात घडली. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जमीन खचून निर्माण झालेला खड्डा सुमारे 15 ते 20 फूट असल्याचे नागरिकांनी सांगितले. गिरीजाशंकर विहार सोसायटी येथे एक विहीर आहे. तेथेच वाहन पार्किंग स्थळ असून, त्यालगतची जमीन सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक खचली. स्थानिक नागरिकांनी ही माहिती सोसायटी सदस्यांना दिली. त्यांनीदेखील तातडीने पालिकेच्या अग्निशमन दल आणि अभियंत्यांना ही माहिती दिली. दरम्यान, ही जमीन का खचली? याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता. सुमारे 15 ते 20 फूट खोल हा खड्डा असून, त्याबाबत सोसायटीधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेचे कारण पालिकेचे अभियंते शोधणार असून, तेथे उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत. दरम्यान, याबाबत रात्री उशिरा पालिका अधिकाऱ्यांशी या घटनेबाबत चर्चा केली असता, सध्या येथे कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.