प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथे 27 वर्षीय युवकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 3) उघडकीस आली.याप्रकरणी संतोष बिजम पवार (वय 41, पोलीस हवालदार, जुन्नर पोलीस स्टेशन) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. अंकुश काशिनाथ पारधी (रा. तांबे, शिवेचीवाडी, ता. जुन्नर) आणि शिवराम बाळू जाधव (रा. कबाडवाडी, ता. जुन्नर) यांनी अरुण रोहीदास पारधी (वय 27, रा. तांबे, शिवेचीवाडी) या युवकाचा खून केल्याचा आरोप आहे. 26 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास मौजे पिंपळगाव खडकी येथे राजू बबनराव शिंदे यांच्या विहिरीजवळ ही घटना घडली.अरुण पारधी हा चुलत भाऊजय हिरा विलास पारधी यांच्या पायाजवळ बसला होता, याचा राग मनात धरून आरोपींनी त्याच्यावर काठीने मारहाण केली. त्यानंतर दगडाने डोक्यावर प्रहार करून त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अरुणच्या कमरेला कपड्याने दोन दगड बांधून त्याला विहिरीत टाकून दिले. या प्रकरणी गुन्हा 3 नोव्हेंबर जुन्नर पोलीस स्टेशन डायरी क्रमांक 39/2025 प्रमाणे नोंदविण्यात आला. गुन्ह्यात वापरलेले हत्यार म्हणजे काठी आणि दगड असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींचा पूर्व इतिहास निरंक असल्याचेही पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.