पुणे – माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यवसायिकाकडे तीन कोटींच्या खंडणीची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. ही खंडणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमाचा निधी म्हणून मागण्यात आली होती. यासाठी आरोपींनी मुरलीधर मोहोळ यांचा मोबाइल क्रमांक स्पुफिंग कॉल करुन वापरला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
राजेश दिनेश व्यास (वय 56, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. संदीप पीरगोंडा पाटील व शेखर गजानन ताकवणे (वय 35 रा. कर्वे रोड) यांना अटक केली आहे. व्यास यांचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी जुने संबंध आहेत. मोहोळ यांच्या मोबाइल क्रमांकावरुन त्यांना फोन आला. समोरच्या व्यक्तीने तो मोहोळ यांचा मावसभाऊ रवी बोलतोय असे सांगितले.
अण्णांचा निरोप आहे की भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी मदत पाहिजे, असे त्याने सांगितले. त्यावर व्यास यांनी त्यास पुन्हा फोन करुन 10 लाख रुपये देऊ शकतो, असे सांगत कार्यालयात बोलावले.
व्यास यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी कार्यालयात सापळा रचला. सायंकाळी त्यांच्या कार्यालयात शेखर ताकवणे दाखल झाला. त्याने व्यास यांना रक्कम द्यावीच लागणार, नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये हानी पोहोचेल, असा दम भरला. यानंतर बॅग हातात घेताच पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बडे करत आहेत.
मुख्य आरोपीसाठी कात्रज घाट बंद
ताकवणेला पैसे घेताना पकडल्यावर पोलिसांनी त्याला संदीप पाटीलशी संपर्क साधण्यास सांगितले. पाटीलने त्याला पैसे घेऊन स्वारगेट चौकात येण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुसरा सापळा स्वारगेट चौकात लावण्यात आला; पण तो सारखा ठिकाण बदलत होता. नंतर त्याने कात्रज जुना बोगदा येथे पैसे घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी घाटातील वाहतून बॅरिकेड्स लावून थांबवली. यानंतर थांबलेल्या वाहनांच्या गर्दीतून पाटील याला शोधून काढले.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर, पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजीव कळेंबे, प्रताप पडवाळ, प्रकाश कट्टे, ज्ञानेश्वर चित्ते, विकास चौगुले, सावंत यांनी केली.
व्यास यांना माझ्यानंबरचा वापर करुन कोणीतरी फसवत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. मी यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपींना मी ओळखत नाही.
– मुरलीधर मोहोळ, माजी महापौर