धक्कादायक ! तब्बल 3 हजार करोनाबाधित बेपत्ता

बंगळुरू – कर्नाटकची राजधानी बंगळुरू हे देशातील सर्वांधिक करोना संसर्गग्रस्त शहर ठरले आहे. अशात त्या शहरातून तब्बल 3 हजार करोनाबाधित बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बंगळुरूबरोबरच संपूर्ण कर्नाटक राज्य आणखी धास्तावले आहे.
कर्नाटकमध्ये मंगळवारी 30 हजारांहून अधिक नवे करोनाबाधित आढळले. त्यातील 17 हजार बाधितांची नोंद एकट्या बंगळुरू शहरात झाली. त्यामुळे त्या शहरातील स्थिती चिंताजनक बनल्याचे चित्र असतानाच कर्नाटकचे मंत्री आर.अशोका यांनी बेपत्ता बाधितांविषयीची माहिती दिली. बेपत्ता झालेले बाधित त्यांची घरे सोडून इतरत्र गेले आहेत. मात्र, त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती नाही. बहुतांश बेपत्ता बाधितांनी त्यांचे मोबाईल फोनही बंद ठेवले आहेत. त्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
बेपत्ता बाधितांच्या चुकीच्या वर्तनाने करोना फैलाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे त्यांना समोर येण्याचे आवाहन मी करतो. त्यांनी अखेरच्या क्षणी रूग्णालयांमध्ये आयसीयू बेडची शोधाशोध करणे योग्य नव्हे, असे अशोका येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कर्नाटकमधील करोना संकट तीव्र बनल्याने त्या राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

