मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून भावेश सेठ नामक व्यावसायिकाने उडी घेत आत्महत्या केली. 56 वर्षीय भावेश सेठ यांनी व्यवसायात कर्जबाजारी झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. भावेश सेठ यांचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी (ता. 17 जुलै) भावेश यांनी दुपारी 01 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडे सी लिंकपर्यंत लिफ्ट मागितली.
सी लिंकवर उतरल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला. यावेळी त्यांनी फोनवरून मुलाला केवळ सॉरी बेटा म्हणत ते आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. भावेश सेठ यांचे मुलाशी फोनवरून बोलणे झाल्यानंतर त्यांनी सी-लिंकवरून उडी घेतली.
या घटनेची माहिती सी लिंकवरील पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मच्छिमारांसह त्यांचा खोल समुद्रात शोध घेतला. पोलिसांनी लागलीच मच्छिमारांच्या मदतीने भावेश यांचा शोध घेतल्याने ते सापडले. यानंतर त्यांना समुद्राच्या बाहेर आणत भाभा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.