अजित पवारांना धक्का; आणखी एक नेता साथ सोडत करणार शरद पवार गटात प्रवेश

Babajani Durrani | विधानसभा निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरणात मोठी घडामोड घडली आहे. परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. आज दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.
अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे पक्षात अस्वस्थ असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जर काही शब्द मिळाला, तर बाबाजानी हे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, अशी परिस्थिती असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज दुपारी 2 वाजता बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत.
दरम्यान, त्यापूर्वी अजितदादांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पाथरी येथील निवासस्थानी घरी जयंत पाटील दाखल झाले होते. त्यामुळे बाबाजानी दुर्रानी यांच्या शरद पवार गटात सामील होण्याच्या चर्चांना उधान आले होते.
बाबाजानी दुर्राणी कोण आहेत?
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. बाबाजानी दुर्राणी हे परभणीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते विधान परिषदेचे आमदार होते. पुन्हा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं.
पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. अजित पवारांनी त्यांच्याऐवजी परभणीतील राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर निवडून आणले. बाबाजानी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा:
स्थानिक हॉटेल्समध्ये आढळले ‘कुत्र्याचे मांस’ ? FSSAI ने नमुने घेऊन तपास केला सुरू





