जामखेड – अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापासून सस्पेन्समध्ये राहिलेल्या जामखेड नगरपरिषदपदासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर तब्बल ८२ उमेदवारांचे अर्ज त्रुटीमुळे रद्द करण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी १३ तर नगरसेवक पदासाठी २४ जागांसाठी १२१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. छाननीदरम्यान काही उमेदवारांच्या अर्जामध्ये आवश्यक संलग्न नसल्याने अर्ज अपात्र ठरविण्यात असल्याने आता आगामी दोन दिवसात कोण आपली शस्त्रे म्यान करणार, यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. जामखेड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी २५ नामांकन दाखल झाले होते. यामध्ये ९ नामांकन बाद करण्यात आले असून, दुबार नामांकन ३ आहेत. एकूण १३ नामांकन पात्र ठरले आहेत तर नगरसेवक पदासाठी एकूण २१९ नामांकन दाखल झाले होते. यापैकी ८२ नामांकन बाद करण्यात आले. यामध्ये दुबार नामांकन १६ असून १२१ नामांकन पात्र ठरविण्यात आले. जामखेड नगरपरिषदेत एकूण २४ जागांसाठी १२१ उमेदवार रिंगणात असून, प्रभागनिहाय लढती अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता वाढली आहे. प्रमुख पक्षांसह अपक्षांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. प्रत्येक पक्षाकडून शक्तिप्रदर्शन आणि कार्यकर्त्यांचा रस्सीखेच सुरू असून, अधिकृत उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणाला अधिक वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी आता दोन दिवसांची मुदत उमेदवारांकडे आहे. या कालावधीत स्वतःहून माघार घेतलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतरच प्रत्येक प्रभागातील खरी निवडणूक लढत स्पष्ट होणार आहे. नगरपरिषद निवडणुकीचा ताप वाढत असताना वैध-अवैध अर्जांचे प्रमाण लक्षवेधी ठरले असून आगामी काही दिवसात राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.