Shivshahi Bus – ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका उड्डाणपुलावर गुरुवारी राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत या बसमधील सर्व १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. दुपारी १.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, शिवशाही ही वातानुकूलित बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे आणि त्यातून काळ्या धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसून आले. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन ताडवी यांनी सांगितले की, ही बस पुण्यातील स्वारगेट येथून वसईच्या दिशेने निघाली होती. Shivshahi Bus : शिवशाही बसला भीषण आग, बस जळून खाक! १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी बस स्थानकातून निघाल्यानंतर काही वेळातच पुलावर या बसला आग लागली. बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे दिसताच मी धोक्याचा इशारा दिला आणि त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना घाईघाईने बाहेर काढले, असे चालकाने सांगितले. आग लागली तेव्हा बसमध्ये एकूण १४ प्रवासी, एक एसटी कर्मचारी, चालक आणि वाहक असे मिळून १७ जण होते. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक अग्निशमन दलाचे जवान आणि इतर आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. (Shivshahi Bus ) सुरक्षेच्या कारणास्तव, या उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. दुपारी २.३० च्या सुमारास ही आग पूर्णपणे विझवण्यात आली. बसचे डिझेल आणि ऑइल गळती होऊन ते रस्त्यावर पसरले होते. पुढील अपघात किंवा वाहने घसरण्याच्या घटना टाळण्यासाठी पथकांनी रस्त्यावर माती पसरली. ही बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.