Shivsena Leader : राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने राजकीय पक्षांच्या (Shivsena Leader) हालचालींना वेग आला आहे. युती आणि आघाड्यांसाठीच्या बैठकांना गती मिळाली असून, नेतेमंडळी मोर्चेबांधणीच्या कामात व्यस्त झाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर अमरावती शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यातील युती तुटल्याची अफवा पसरली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांतच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुन्हा बोलणी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. याच चर्चेदरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत ढासळली. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर भाजपचे आमदार संजय कुटे यांनी त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. समोर आलेल्या तपशीलानुसार, आमदार संजय कुटे आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांच्यात निवडणुकीच्या जागावाटपाबाबत पुन्हा एकदा सविस्तर चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी आज दुपारी शिवसेनेने भाजपसमोर काही जागांच्या वाटपाबाबत प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भाजपने तो प्रस्ताव अमान्य केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, आता पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. पुढील काही दिवसांत याबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जर शिवसेना आणि भाजप वेगळे लढले, तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतदारांमध्ये विभागणी होऊन इतर पक्षांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे युती टिकवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचे समजते. या चर्चेतून युती होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील २०१७ च्या अमरावती महापालिका निवडणुकीचा इतिहास पाहता, भाजपने येथे मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपने ४५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. परिणामी, चेतन गावंडे यांना महापौर पदाची संधी मिळाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसने १५ जागा, शिवसेनेने ७ जागा, असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमने १० जागा, मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने ५ जागा, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने ३ जागा जिंकल्या होत्या. तसेच, आरपीआय (आठवले गट) ने १ जागा आणि एक अपक्ष उमेदवाराने १ जागा जिंकली होती. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत युती होऊन भाजप-शिवसेना एकत्र लढले तर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे, अन्यथा स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.