Ramdas Kadam : CM पदावरुन रामदास कदम यांचा मोठा आरोप; म्हणाले ‘अजित पवारांमुळे..’

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमत दिले. यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. मात्र आता मुंख्यमंत्री पदावरून महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर येताना दिसत आहे. यादरम्यान आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मुंख्यमंत्री पदावरून मोठा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले रामदास कदम?
“भाजपाच्या मंडळींना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, शिवसेनेच्या आमदारांना वाटतं एकनाथ शिंदे व्हावेत. अजित पवार तर आता सरेंडर झाले आहेत. त्यांनी आमची बार्गेनिंग पॉवर कमी केली आहे हा वेगळा भाग आहे,” असा आरोपच रामदास कदम यांनी केला आहे. पण मुख्यमंत्रीपदावरुन कोणी, कितीही, काहीही प्रयत्न केले तरी आमच्या युतीत मतभेद होणार नाहीत असे रामदास कदम म्हणाले.
“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली होती. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून ही लढाई लढली आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं आहे. आता झुकतं माप कोणत्या बाजूला टाकायचं याचा निर्णय श्रेष्ठींना घ्यायचा आहे,” असेदेखील रामदास कदम म्हणाले आहेत.





