सासवड : तीर्थक्षेत्र श्री यमाई शिवरी ग्रामपंचायतीमध्ये परमिट रूम बिअर बार याच्या परवानगीसाठी आलेल्या अर्जावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेची आवश्यक संख्याबळ पूर्ण न झाल्यामुळे गणपूर्तीअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे दारू व्यवसायांना परवानगी द्यायची किंवा नाही याबाबतचा निर्णय अखेर पुढे ढकलला आहे. दरम्यान, तहकूब झालेल्या ग्रामसभेची पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. “अध्यक्षांच्या परवानगीने तारीख ठरल्यानंतर ग्रामस्थांना कळवण्यात येईल,” अशी माहिती ग्रामसेविका शितल भुजबळ यांनी दिली. ग्रामसभेसाठी आवश्यक असलेली १०० जणांची उपस्थिती न झाल्याने केवळ ८८ ग्रामस्थ उपस्थित राहिले. त्यामुळे अधिकृत कामकाज सुरू करता आले नाही. मात्र, तरीही ग्रामसभेत सामाजिक प्रश्नांवर ग्रामस्थांनी ठाम भूमिका मांडत सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. काही दिवसांपासून शिवरी हद्दीत बिअरबार व परमिट रूम सुरू करण्यासाठी आलेल्या अर्जामुळे गावात अस्वस्थता निर्माण झाली होती. सभेला सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवकही उपस्थित होते. यावेळी महिलांनी विशेष पुढाकार घेत आपली ठोस भूमिका मांडली. गावाच्या काही भागात हातभट्टी व बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप करत ही विक्री तात्काळ बंद करावी, अशी जोरदार मागणी महिलांसह ग्रामस्थांनी केली. “गावात कोणत्याही प्रकारचा दारू व्यवसाय सुरू राहू नये,” अशी स्पष्ट भूमिका बहुसंख्य ग्रामस्थांनी नोंदवली. श्री क्षेत्र यमाई मातेच्या दर्शनासाठी शिवरी येथे बाराही लाखो भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या परिसरात दारूविक्रीसारखे व्यवसाय सुरू होणे अयोग्य आहे यमाई देवस्थान ट्रस्टी व त्यातील सर्व विश्वस्त हे गावातीलच नागरिक असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून अशा दारू व्यवसायांना विरोध करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नवनाथ बबनराव कामथे यांनी मांडले. उद्योजक अनिल कामथे म्हणाले की, “गावात परमिट रूम, बिअर बार तसेच दारू विक्रीचा व्यवसाय सुरू होणे चुकीचे आहे. या व्यवसायांमुळे युवक बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी संघटित होऊन कडाडून विरोध करणे आवश्यक आहे. आगामी ग्रामसभेत या विषयावर निर्णायक निर्णय होणार असल्याचे संकेत ग्रामस्थांकडून दिले आहेत. सामाजिक वातावरण बिघडवू नका ग्रामस्थांच्या मते बिअर बार, परमिट रूम, हातभट्टीसारखे व्यवसाय गावात सामाजिक वातावरण बिघडवतात. अशा व्यवसायांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाते, आरोग्य, शैक्षणिक प्रगतीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा व्यवसायांना पूर्णतः आळा घालण्यात यावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी सभा तहकूब झाल्यानंतर एकमताने मांडली.