नाशिक : शेतकऱ्यांची शाश्वत आर्थिक उत्पादकता वाढवण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती आवश्यक आहेत. लहान जमीनधारक शेतकरीही त्याचा फायदा घेऊ शकतात, असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. ते येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. चौहान म्हणाले, बदलत्या हवामानामुळे आणि नैसर्गिक आपत्त्यांमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे, शाश्वत आर्थिक उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी एकात्मिक शेती पद्धती गरजेच्या आहेत. एकात्मिक शेतीचा फायदा लहान जमीनधारकांनाही मिळू शकतो. कुक्कुटपालन, पशुसंवर्धन, रेशीम उद्योग, मत्स्यपालन आणि फलोत्पादन यांसारखे पूरक व्यवसाय स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. हवामान बदलांना तोंड देणाऱ्या पिकांच्या नवीन जातींच्या विकासासाठी सरकार उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी, चौहान यांनी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देऊन पूजा-अर्चा केली.