नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 2021 ते 2025 या पाच वर्षांच्या काळात 18989 कोटी 60 लाख रूपयाची मदत करण्यात आली असल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत दिली. छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपन भुमरे आणि लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी दुष्काळामुळे पीक गमाविलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक सहाय्य प्रदान केले काय असा प्रश्न विचारला होता. 2023- 24 मध्ये पडलेल्या दुष्काळासाठी राज्याकडून मागणी न झाल्यामुळे केंद्राने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत निधी दिला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. गाय राष्ट्रीय पशु नाही गायीला राष्ट्रीय पशु जाहीर करण्याशी संबधित कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी खात्याचे राज्यमंत्री एसपी सिंग बघेल यांनी लोकसभेत दिली. केंद्र सरकार गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्याची तयारी करीत आहे अशी चर्चा सोशल मिडियावर रंगली होती. मात्र, सरकारने आज आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारने 1972 मध्ये वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केले होते. हिंदु धर्मात गायीचे खास महत्व आहे. यामुळे गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्याची मागणी वेगवेगळ्या संघटनांकडून होत होती.