Shivraj Singh Chouhan : बिहारमध्ये एनडीएचा रेकॉर्डब्रेक विजय निश्चित; मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वर्तवले भाकीत

पाटणा : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीए रेकॉर्डब्रेक विजय मिळवेल, असे भाकीत केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. त्यासाठी त्यांनी बिहारमध्ये अभूतपूर्व विकासकामे सुरू असल्याचे कारण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विकासाची गंगा वाहत असल्याचे अनुभवत आहे.
त्यामुळे एनडीए प्रचंड बहुमताने सत्ता राखेल, असे भाजपचे नेते असणाऱ्या शिवराज यांनी पाटण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले. विरोधकांच्या महाआघाडीने अद्याप राजदचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले नाही. इतर लहान पक्ष त्यासाठी राजी असले तरी अद्याप कॉंग्रेस त्याविषयी मौन बाळगून आहे. त्याचा संदर्भ घेऊन शिवराज यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना शाब्दिक चिमटा काढला.
परदेशात असणारा नेता (राहुल) येथे असलेल्या नेत्याच्या (तेजस्वी) नावावर शिक्कामोर्तब करण्यास उत्सुक नाही, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी सध्या राहुल परदेश दौऱ्यावर असल्याचा आधार घेतला. बिहारमधील आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्यास भाजप सज्ज झाला आहे. त्यातून त्या पक्षाच्या केंद्रीय नेत्यांचे बिहार दौरे वाढले आहेत.





