लातूर : सहा दशके आपल्या सुसंस्कृत राजकारणाचा ठसा उमटवणारे लातूर जिल्ह्याचे सुपूत्र लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकुरकर यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी वरवंटी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशभरातून आलेल्या असंख्य मान्यवरांनी शिवराज पाटील चाकुरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन त्यांना शेवटचा निरोप दिला. यावेळी पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरींची सलामी देऊन मानवंदना दिली. देशाचे माजी गृहमंत्री, लोकसभेचे माजी सभापती, पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर यांचे दि. १२ डिसेंबर रोजी निधन झाले. शनिवारी सकाळी देवघर निवासस्थानी शिवराज पाटील चाकुरकर यांच्या पार्थिवाला पोलीस दलातर्फे मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रेस सुरुवात झाली. त्यांचे पार्थिव औसा रोडवरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक, संविधान चौक, एक नंबर चौक, पीव्हीआर चौक, एमआयडीसी मार्गे वरवंटी येथील त्यांच्या शेतात आणण्यात आले. यावेळी उपस्थित शोकाकुल जनसमुदाच्या उपस्थितीत शिवराज पाटील चाकुरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.