Shivneri Fort : किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव; पर्यटन विभागातर्फे आयोजन
Shivneri Fort : सांस्कृतिक, क्रीडा, लोककलेचे विविध उपक्रम

Shivneri Fort : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर दि. १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव : हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देणारे सांस्कृतिक, क्रीडा आणि लोककलेचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या जन्मस्थानी हा महोत्सव साजरा करताना आम्हाला अभिमान वाटत असून, याद्वारे महाराजांचे विचार आणि शिवकालीन संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
महोत्सवाचे स्वरूप सर्वसमावेशक असून, यामध्ये महाराष्ट्राच्या पारंपरिक कलागुणांना वाव देण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी सांगितले.
तीन दिवसीय या कार्यक्रमात लोकगीतांवर आधारित द फोक आख्यान, भव्य कबड्डी स्पर्धा, बैलगाडा शर्यत, महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव आकर्षणाचे केंद्र ठरेल.
१८ फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यत, लोककलेवर आधारित द अभंग रिपोस्ट, महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव, केसरी कुस्ती स्पर्धा, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना, ऑल दि बेस्ट नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
महोत्सवाच्या अंतिम दिवशी, १९ फेब्रुवारीला सकाळी शिवकालीन मर्दानी खेळांचे चित्तथरारक सादरीकरण, महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव, तसेच सायंकाळी ५ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांच्या महाआरतीने आणि बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी या महोत्सवाची सांगता होईल.





