ओझर – शिवनेरी फाउंडेशनच्या खानापूर (जुन्नर) येथील शिवनेरी स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५ उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे संचालक डॉ. चंद्रकांत कणसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, यावेळी अध्यक्षा डॉ. सरस्वती कणसे, सचिव शुभंकर कणसे, सीईओ श्रद्धा कणसे यांसह मान्यवर उपस्थित होते. मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रणजी क्रिकेट टीमचे सिलेक्टर किरण जोशी यांनी खेळातील शिस्त, निष्ठा आणि अथक प्रयत्न हेच यशाचे मूलभूत स्तंभ असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. ऍथलेटिक्स, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉलसह विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी धडाडी आणि उत्कृष्ट रणनीती दाखवली. प्रत्येक हाऊसने उच्च कोटीची संघभावना आणि समन्वय प्रदर्शित केला. शाळेच्या क्रीडा परंपरेचे प्रतीक ठरलेली ‘ट्रॉफी’ हे विशेष आकर्षण होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके प्रदान करण्यात आली. कॅम्पस इन्चार्ज राजेंद्र मुरादे, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटाडे, प्राचार्य संजय मिश्रा, सल्लागार अमोल थोरात यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आयोजन सुरळीत पार पडले.