मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाहून शिवनेरी बससेवा सुरू होणार
Updated On:

एसटी महामंडळाच्या निर्णयाने शेकडो प्रवाशांना होणार फायदा
पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एस.टी.) वातानुकूलित शिवनेरी बससेवा मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लवकरच सुरू होणार आहे. येत्या महिनाभरात स्वारगेट-बोरिवली मार्गावरील शिवनेरी बस आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन जाणार आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरुन पुण्याला येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी स्वारगेट-बोरीवली शिवनेरी बसच्या मुंबईतील देशांतर्गत विमानतळ (डोमेस्टिक) या ठिकाणाहून दररोजच्या 18 फेऱ्या सुरू आहेत. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनही सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी शिवनेरी बसचे पार्किंग करण्यासंबधी विमानतळ प्रशासनाशी चर्चा सुरू असून लवकरच या मार्गावर सेवा सुरू होणार आहे.





