मेढ्यात शिवेंद्रसिंहराजेंचा भव्य सत्कार: “तुमच्या हृदयात जागा मिळाली, हाच माझा खरा सन्मान!”

मेढा (विजय सपकाळ) – “मंत्री मी महाराष्ट्र राज्यासाठी आणि तुमच्यासाठी आजही बाबांचं आहे. माझ्यासाठी राबणाऱ्यांना मी कधीच विसरणार नाही. मी तुमचा पाहुणा नाही, मला तुमच्या हृदयात जागा मिळाली, घर करता आलं हाच माझा सत्कार आहे. या कार्यक्रमामुळे राज्यात काम करण्याची नवी ऊर्जा मिळेल,” असे भावनिक उद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथील एका भव्य सत्कार सोहळ्यात व्यक्त केले.
मेंढा येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. या सोहळ्यात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, जावळी बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे, चंद्रकांत गावडे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर धनावडे, बापूराव पार्टे, जयदीप शिंदे, विजय शेलार, समीर आतार, राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
जावळीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध: शिवेंद्रसिंहराजे –
आपल्या भाषणात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपली बांधिलकी दर्शवली. “आबांच्या माध्यमातून वहागांवसह सर्व पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावू. मेढा तहसील कार्यालयाचे काम सुरू आहे, अत्याधुनिक स्मशानभूमी उभारली जाणार आहे. मेढ्याचा घरपट्टीचा प्रश्न लवकरच मिटेल. कोणी मागणी करो वा न करो, जावळीतील स्मशानभूमीचे रस्ते काँक्रीटचे पक्के करण्याचे नियोजन केले आहे. संपूर्ण तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. “रस्त्यांअभावी डोलीतून जाणारी वाहतूक आता थांबली आहे. रस्ते झाले, शेतीला पाणी मिळाले पाहिजे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. यासाठी बोंडारवाडी धरण, महू हातगेघर धरण आणि सोळशी धरण पूर्ण व्हावीत यासाठी मी प्रयत्नशील आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
“बाबाराजे गरुडासारखे तीक्ष्ण नजर ठेवतात”: मकरंद पाटील
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यशैलीचे कौतुक केले. “बाबाराजे गरुडासारखे तीक्ष्ण आणि बारीकसारीक नजर आपल्या मतदारसंघावर ठेवतात. ते कमी बोलतात, पण प्रचंड काम करतात,” असे त्यांनी सांगितले.
“विकासाचे दालन सुरू झाले”: सदाशिव सपकाळ
माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनीही शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्याचा गौरव केला. “बाबांच्या माध्यमातून जावळीत विकासाचे दालन सुरू झाले आहे. याचा निश्चितच सर्वसामान्यांना फायदा होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“जावळीकरांना अभिमान”: वसंतराव मानकुमरे
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले, “जावळीच्या मातीतून निवडून आलेला आमदार पहिल्यांदाच मंत्री झाला. याचा जावळीकरांना मोठा अभिमान आहे. बाबांनी रस्त्यांचे जाळे विणले आहे. आता हुमगाव ते वाई असा रस्ता तातडीने व्हावा. या सरकारने साताऱ्याचा सन्मान केला आहे.”
“जावळीचा कायापालट होईल”: ज्ञानदेव रांजणे
जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी विश्वास व्यक्त केला की, “महाराजसाहेबांच्या नेतृत्वाने जावळीचा कायापालट ‘न भूतो न भविष्य’ असा होईल.”
दरम्यान, सुहासदादा गिरी, सौरभ शिंदे, एकनाथ ओंबळे, एकनाथ रोकडे, मुळीक, अरुणा शिर्के, पांडुरंग जवळ, रामभाऊ शेलार यांनीही आपली मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर धनावडे यांनी सर्वांचे आभार मानले.
हा सत्कार सोहळा मेढा आणि जावळी तालुक्यातील नागरिकांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला, ज्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांना नवीन दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली.



