Satara | शिवेंद्रराजेंचा एक लाख 42 हजार मतांनी विक्रमी विजय

सातारा, – सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपेक्षेप्रमाणे एकतर्फी बाजी मारत, आपला गड अभेद्य ठेवला. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा तब्बल एक लाख 42 हजार 124 इतक्या विक्रमी मतांनी पराभव केला. आ. शिवेंद्रराजेंनी राज्यात नंबर एकचे मताधिक्य मिळवले. अमित कदम यांना अवघी 34 हजार 725 मते मिळाली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विक्रमी विजयाचा आनंद सातारा आणि जावळी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलाल उधळून व्यक्त केला. सातार्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी‘आया है राजा लोगो रे लोगो’ या गाण्यावर ताल धरत जल्लोषी मिरवणुका काढल्या. येथील नवीन औद्योगिक वसाहतीतील शासकीय गोदामामध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. प्रारंभी पोस्टल मते मोजल्यावर 8.30 वाजल्यापासून 20 टेबलांवर मतदान यंत्रांमधील मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली.
निवडणूक निरीक्षक वंदना वैद्य, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या देखरेखीखाली मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी 2807 टपाली मतदान मोजण्यात आले. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना 4314, तर अमित कदम यांना 1062 मते मिळाली. या फेरीत शिवेंद्रसिंहराजे यांनी तीन हजार 72 मतांची आघाडी घेतल्यानंतर गोदाम परिसराच्या बाहेर त्यांच्या समर्थकांचा जल्लोष सुरू झाला. दर पंधरा मिनिटाला फेरीनिहाय मतमोजणीचे आकडे जाहीर होऊ लागले. दुसर्या फेरीत शिवेंद्रराजेंनी 7613 मतांचे अधिक्य घेतले. त्यानंतर प्रत्येक फेरीनिहाय त्यांचे मताधिक्य वाढत गेले. पहिल्या पाच फेर्यांमध्ये त्यांचे मताधिक्य 15000 झाले. त्याच वेळी शिवेंद्रराजे यांचा विजय निश्चित झाला. मात्र, ते किती मताधिक्याने विजयी होणार याची कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. सुरुवातीला जावळी तालुका, त्यानंतर सातारा तालुका आणि नंतर सातारा शहर अशी मतमोजणी झाली. प्रत्येक फेरीमध्ये सुमारे साडेदहा हजारांचे मताधिक्य शिवेंद्रराजे यांनी घेतले.
विरोधी उमेदवार अमित कदम यांना मतदारांनी म्हणावी तशी साथ दिली नाही. प्रत्येक फेरीमध्ये त्यांची मते अडीच ते साडेपाच हजार अशी वाढत गेली. मात्र, ती पुरेशी नव्हती. 10 ते 21 या फेरीदरम्यान शिवेंद्रराजेंची आघाडी विक्रमी मतांनी वाढत गेली. दुपारी 12.30 नंतर गोदाम परिसर, सातारा शहर, तालुका आणि जावळी तालुक्यात फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. त्याच दरम्यान शिवेंद्रराजे आपल्या कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रात उपस्थित झाले. सुधाकर भोसले यांनी अंतिम निकाल दुपारी 1 वाजता जाहीर केला. शिवेंद्रराजेंना एक लाख 76 हजार 849, तर अमित कदम यांना 34 हजार 725 मते मिळाली. शिवेंद्रराजेंना एक लाख 42 हजार 124 इतके राज्यातील नंबर एकचे विक्रमी मताधिक्य मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले.
लक्षवेधी बाब म्हणजे ‘नोटा’ला 2419 मते मिळाली. इतर उमेदवारांमध्ये मिलिंद कांबळे यांना 1161, बबन करडे यांना 2772, शिवाजी भगवान माने यांना 606, अभिजित बिचुकले यांना 529, गणेश जगताप यांना 504 व कृष्णा भाऊराव पाटील यांना 516 मते मिळाली. या मतदारसंघात एकूण दोन लाख 20 हजार 507 मतदान झाले. त्यापैकी दोन लाख 17 हजार 62 मध्ये वैध, तर 426 मते तांत्रिक कारणास्तव अवैध ठरले. निकालानंतर सुधाकर भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजेंना खांद्यावर उचलून घेतले. तेथून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.
शिवेंद्रराजेंच्या विजयानंतर ‘गुलाल महोत्सव ’
शिवेंद्रराजेंच्या विक्रमी विजयाने सातार्यात जणू ‘गुलाल महोत्सव’ साजरा झाला. कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र परिसरात जल्लोष केला. नगरविकास आघाडीच्या सर्व माजी नगरसेवकांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली. शहरात मतमोजणी केंद्र ते पोवई नाका अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुलालांच्या उधळणीत बाबाराजे न्हाऊन निघाले. क्रेनवर लटकणार्या मोठमोठ्या पुष्पहारांनी बाबाराजे यांचे स्वागत केले. शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला शिवेंद्रराजेंनी अभिवादन करताच, ‘बाबाराजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर ही मिरवणूक सुरुची या निवास्थानी आल्यावर, तेथेही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. हा विजय संपूर्ण सातारा व जावळीतील मतदारांचा आहे. या विजयाने विरोधकांना योग्य उत्तर मिळाले आहे. जनतेला अडीअडचणींच्या काळात सुरुचीचे दरवाजे कायम खुले राहतील. यापुढेही मतदारसंघात विकासाची गंगा अशीच वाहत राहील, अशी ग्वाही शिवेंद्रराजेंनी दिली.
जिल्ह्याचे पालकत्व उदयनराजेंकडे
जिल्ह्यात भाजपचे पहिला खासदार अशी नोंद उदयनराजे भोसले यांच्या नावावर झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील भाजप व महायुतीच्या उमेदवारांसाठी उदयनराजेंनी जोरदार रणनीती आखली होती. कार्यकर्त्यांबरोबर प्रचार, उमेदवारांसाठी सभा, प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी जनतेला आवाहन करणे, शिवाय कार्यकर्त्यांचे संघटन सांभाळणे, अशी बरीच कामे उदयनराजेंनी ज्येष्ठत्वाच्या नात्याने केली. सातार्यात तर ते शिवेंद्रराजेंच्या मागे सावलीसारखे उभे राहिले. मुळात शिवेंद्रराजेंनी मतदारसंघात केलेली प्रचंड विकासकामे आणि मतदारसंघावर असलेली पकड यामुळे त्यांचा विजय सोपा होता. त्यातही उदयनराजेंनी त्यांच्या मागे सातारा विकास आघाडीची फळी उभी केली. उदयनराजे हे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत, असे खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्याने, जिल्ह्याचे पालकत्व आपोआप उदयनराजेंकडे आले आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
सातार्यात दिसून आले खरेखुरे मनोमीलन
उदयनराजे व शिवेंद्रराजे यांचे मनोमिलन झाल्याने लोकसभा निवडणुकीत उदयनराजे निवडून आले. आता विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. शहरातील राजकारणात एकमेकांवर सतत तोंडसुख घेणारे नगरविकास व सातारा विकास आघाडीचे सर्व माजी नगरसेवक शिवेंद्रराजेंच्या प्रचारात एकत्र दिसले. शहरातील मतदान केंद्रांवर दोन्ही आघाड्यांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक ठाण मांडून बसल्याने, शिवेंद्रराजेंना मोठी मदत झाली. शिवेंद्रराजेंनी जावळी तालुक्यावर लक्ष केंद्रित केले असता, सातारा शहरातील धुरा दोन्ही आघाड्यांच्या माजी नगरसेवकांनी सांभाळली. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सातार्यात खरेखुरे मनोमीलन दिसून आले.
फडणवीसांची चाणक्य नीती
जिल्ह्यात महायुतीमध्ये गटातटाचे राजकारण होणार नाही, याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारकाईने लक्ष ठेवले होते. संघटन, बूथ, मंडल प्रमुखांकडून महाराष्ट्राचे प्रभारी अश्विनी वैष्णव हे सातत्याने आढावा घेत होते. उदयनराजेंनी बांधलेली मोट आणि त्याला फडणवीसांच्या चाणक्य नीतीची जोड मिळाल्याने, जिल्ह्यात महायुतीचे आठही उमेदवार निवडून आले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा जिल्ह्यात पहिल्यांदाच सुपडासाफ झाला आहे. सातारा जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला झाल्याचे, आता खर्या अर्थाने म्हणता येईल. फडणवीस यांनी जिल्ह्यात दोन सभा घेऊन, भाजपची संपूर्ण रसद महायुतीच्या उमेदवारांच्या मागे उभी केली. लाडकी बहीण योजना, युवकांना रोजगार आणि वेगवेगळ्या महामंडळाच्या घोषणा करत, महायुतीने अखेरच्या टप्प्यात मतदारांना आपलेसे केले.





