“…तर धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी स्थिती ओढवेल”

सातारा (प्रतिनिधी) – शहराची पुढील 50 वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी 58 कोटींचा वाढीव निधीही मिळाला आहे. येत्या 15 मेपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. वाढीव पाणी क्षमता गृहीत धरून त्या क्षमतेची जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे.
याबाबत पालिका प्रशासनाकडून सर्वेक्षण, कामाचे अंदाजपत्रक करण्यात आलेले नाही. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सातारकरांना पुरेसा पाणीपुरवठा व्हायचा असेल तर नवीन जलवाहिनी आवश्यक आहे, अन्यथा “धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी स्थिती ओढवेल. नवीन जलवाहिनीसाठी सर्वेक्षण, अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार करा, अशी सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिका प्रशासनाला दिली.
कास धरण उंची वाढवण्याचा सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रराजे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी सुरुवातीला 43 कोटी व आता 58 कोटींचा वाढीव निधी मिळवून दिला आहे. त्यामुळे रखडलेले काम पुन्हा युद्धपातळीवर सुरू झाले आहे. हे काम 15 मेपर्यंत पूर्ण होणार आहे.
धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले, तरीही सातारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पाणीपातळीत पाच पट वाढ होणार आहे. धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 1998 ते 2000 या कालावधीत जलवाहिनी टाकण्यात आली होती. उंची वाढल्यानंतर सध्याच्या जलवाहिनीतून वाढीव क्षमतेने पाणीपुरवठा होणे अशक्य आहे. त्यामुळे वाढीव क्षमतेची नवी जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे. त्याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
वाढीव क्षमतेच्या जलवाहिनीसाठी सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. कास धरणातून सायफन पद्धतीने पाणीपुरवठा होत असल्याने त्यासाठी विद्युत मोटारींची गरज भासत नाही. त्यामुळे पालिकेवर आर्थिक बोजा पडत नाही. असे असूनही या बाबींकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली.
याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे त्वरेने सादर करा. पालिकेचे बजेट पाहता स्वखर्चाने नवीन जलवाहिनी टाकणे प्रशासनाला शक्य नाही. या कामासाठी निधी कसा मिळवायचा, ते मी पाहतो. वाढीव क्षमतेची जलवाहिनी नसल्याने धरणाची उंची वाढवून काय फायदा होणार? त्यामुळे पालिका प्रशासनाने नवीन जलवाहिनीच्या कामासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.





