महाराष्ट्राच्या चार मुलांची “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी निवड

नवी दिल्ली (वंदना बर्वे) – महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयंम पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी “पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-2022′ जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले तसेच, प्रातिनिधिक बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सहा श्रेणींमध्ये देशातील 29 बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022′ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील जळगाव येथील शिवांगी काळे (6) , पुणे येथील जुई केसकर (15) ,मुंबई येथील जिया राय (13) आणि नाशिक येथील स्वयंम पाटील (14 ) या बालकांचा समावेश आहे. पदक, 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जळगावच्या शिवांगी काळे हिची शौर्य’ श्रेणीतून निवड झाली आहे. वयाच्या सहाव्या वर्षी साहस, धाडस आणि समयसूचकतेचा परिचय देत शिवांगी हिने विजेच्या धक्क्यापासून आई व बहिणीचे प्राण वाचविले. पुण्याची जुई केसकर हिची “नव संशोधन’ श्रेणीत निवड झाली आहे. जुईने पार्किन्सन रोगग्रस्तांना उपयुक्त ठरतील असे मोजे सदृष्य उपकरण तयार केले असून यास “जे ट्रेमर 3 जी’ असे नाव देण्यात आले आहे.
मुंबई येथील रिया राय हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. 13 वर्षीय रिया ही दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वाटर पॅरा स्विमींग आणि ओपन वाटर स्विमींगमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापीत केला आहे. नाशिक येथील स्वयंम पाटील याची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. स्वयंम ने वयाच्या 10 व्या वर्षी 5 कि.मी. अंतर पोहून तर 13 व्या वर्षी 14 कि.मी. अंतर पोहून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी कला व संस्कृती,शौर्य,नवसंशोधन,सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा या सहा श्रेणींमध्ये “पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’-2022 पटकाविणाऱ्या 29 बालकांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले. पुरस्कार विजेत्यांमध्ये 21 राज्य व केंद्र प्रदेशातील 15 मुल आणि 14 मुलींचा समावेश होता. या कार्यक्रमातच पंतप्रधानांनी वर्ष 2021 च्या “पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या 32 बालकांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले.
पुरस्कार विजेत्या बालकांना देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात हा पुरस्कार मिळत असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार आयुष्यभर स्मरणात राहणार असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. या पुरस्कारासोबत तुम्हा सर्व बालकांवर मोठी जबाबदारी आली आहे. मित्र,कुटुंबिय, समाज अशा वेगवेगळया स्तरातून तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, तेव्हा या अपेक्षांचे ओझे वाटून न घेता त्यातून प्रेरणा घ्या असेही पंतप्रधान म्हणाले.



