Nayak 2 sequel : अभिनेते अनिल कपूर यांचा २००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नायक’ एक कल्ट चित्रपट म्हणून ओळखला जातो. हा चित्रपट आजही टेलिव्हिजनवर लागल्यावर प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. गेल्या काही दिवसांपासून नायक चित्रपटाचा सिक्वल बनणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून, त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलीवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल २५ वर्षांनंतर अनिल कपूर यांनी चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे नायकचा सिक्वल बनणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मूळात ए.एस. रत्नम यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटाचे अधिकार नंतर निर्माते दीपक मुकुट यांनी विकत घेतले. एका सूत्राचा हवाला देत, बॉलीवूड हंगामाने वृत्त दिले की, सनम तेरी कसम फेमचे निर्माते दीपक मुकुट यांच्याकडे नायकचे अधिकार होते. आता चित्रपटाचे हक्क त्यांच्याकडून अनिल कपूर यांनी विकत घेतले आहेत. महत्वाचे म्हणजे हा चित्रपट अनिल कपूर यांच्या खूप जवळचा आहे. मात्र, अद्यापर्यंत नायक २ चित्रपटाची अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नायक चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले असे म्हटले तर वावगे वाटू नये. सगळ्याच वयोगटातील प्रेक्षकांना या चित्रपटाने भुरळ घातली. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक शंकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटाची कथा एका सामान्य तरुणाची होती जो एका दिवसासाठी एका राज्याचा मुख्यमंत्री बनतो. या चित्रपटात राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल, सौरभ शुक्ला, जॉनी लीव्हर, शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. अनिल कपूर यांनी २०२१ मध्ये एका मुलाखतीत नायक चित्रपटावर हा चित्रपट इतका लोकप्रिय होईल, याची कोणतीही कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया दिली होती. हेही वाचा : अखेर जय भानुशाली आणि माही विज यांच्या घटस्फोटाची चर्चा खरी ठरली; १४ वर्षांच्या संसारानंतर झाले विभक्त