‘शिवाजी पार्क’ शिवसेनेच्या उदयाचे ‘साक्षीदार’

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय वादळ संपल्यानंतर आता अखेर सत्तास्थापन होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे युती सरकार सत्तेत येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सत्तेचे नेतृत्व करतील. उद्धव ठाकरे हे शिवसेनेतून मुख्यमंत्री होणारे दुसरे व्यक्ती असतील. यापूर्वी 1995 मध्ये मनोहर जोशी हे पक्षाचे पहिले मुख्यमंत्री झाले होते.
मुंबईच्या दादरमध्ये असलेले शिवाजी पार्क हे गेल्या पाच दशकांत शिवसेनेच्या राजकारणाचे केंद्रस्थान आहे. 1966 मध्ये शिवसेनेची पहिली रॅली ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार या मैदानावर करण्यात आले होते. आणि 1995 मध्ये शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा शपथविधीसोहळा देखील शिवाजी पार्क येथे संपन्न झाला होता. आता याच मैदानावर आज संध्याकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे हे मैदान ऐतिहासिक आहे.
ठाकरे कुटुंबातील चार पिढ्यांच्या माध्यमातून शिवसेनाच उदय या मैदानाने पहिला आहे. या चार पिढ्यांमध्ये केशव ठाकरे ज्यांना प्रबोधनकार नावाने ओळखल्या जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वर आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. दादर-वडाळा-माटुंगा-सायन-माहीम शहर योजनेंतर्गत 28 एकरांवर पसरलेल्या खेळाचे मैदान 1925-26 मध्ये दादरमध्ये प्रथम अस्तित्त्वात आले.
1927 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या मैदानाचे नाव शिवाजी पार्क ठेवण्यात आले. या मैदानावर क्रिकेट आणि फुटबॉल, मलखांब आणि खोखो सारख्या खेळासह अनेक खेळाशी संबंधित कार्यक्रम होतात. याच मैदानावर खेळत दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी मोठे झाले आहेत.
या मैदानावर स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक बैठकी सुद्धा झाल्या. 1960 मध्ये सयुंक्त महाराष्ट्र मागणीच्या बैठकी देखील या मैदानावर झाल्या. 1966 मध्ये पहिल्यांदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याठिकाणी सभेला संबोधित केले होते. शिवसेनाचा दसरा मेळावा देखील याच मैदानात होत असतो. हे मैदान लाखो कार्यकर्त्यांच्या विश्वासाचे केंद्र आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्यावर या मैदानात लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्धव यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांनीही शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली रॅली काढली होती.





