Pimpri : इतिहासाची साक्ष देणारी शिवालये

मावळ : श्रावण महिन्याचा पहिला सोमवार हा भगवान शंकराच्या उपासकांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. या पवित्र दिवशी मावळ तालुक्यातील विविध प्राचीन आणि ऐतिहासिक महादेव मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांचा जनसागर लोटला होता. हर हर महादेव च्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिभावाने गूंजत होता, तर अभिषेक, रुद्रपाठ, दुग्धाभिषेक अशा विधींतून शिवभक्तांनी आपल्या श्रद्धेची भावना व्यक्त केली.
मावळ परिसरात अनेक पुरातन शिवमंदिरे असून, त्यांचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीचा आहे. या मंदिरांमध्ये स्थापत्यशास्त्रीय बारकावे, स्थानिक लोककथा आणि धार्मिक परंपरा यांचे अनोखे मिश्रण आढळते.
केदारेश्वर महादेव मंदिर, तळेगाव दाभाडे
केदारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन स्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मंदिर परिसरातील घुमटाची विहीर, अखंड पाषाणात कोरलेली नंदीची भव्य मूर्ती आणि सुबक स्तंभ यामुळे हे मंदिर भाविकांसोबतच इतिहासप्रेमींचेही आकर्षण ठरते. केदारनाथ मंदीराची प्रतिकृती म्हणून या मंदिराची ओळख आहे.
कोंडेश्वर शिवमंदिर, कामशेत
कोंडेश्वर मंदिर हे कामशेतपासून काही किलोमीटर अंतरावर डोंगरात वसलेले एक रमणीय शिवधाम आहे. हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले असून, वर्षभर येथे पर्यटक आणि भाविकांची वर्दळ असते. डोंगराच्या कुशीत, हिरवाईच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर शांतता आणि ध्यानासाठी प्रसिद्ध आहे.
बाजारवाडी शिवमंदिर, रोहिदा किल्ला पायथा
रोहिदा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले बाजारवाडीचे शिवमंदिर हे देखील प्राचीन आणि स्थानिक पातळीवर श्रद्धेचे केंद्र आहे. इतिहासकार सांगतात की रोहिदा किल्ल्याशी निगडित काही शूर मराठा सैनिकांनी याच मंदिरात पूजन करून मोहिमांवर प्रस्थान केले होते.
वाघेश्वर महादेवांचे उन्हाळ्यातच दर्शन
पवन मावळातील वाघेश्वर मंदिर हे पुरातन काळातील असून, लोककथेनुसार हे मंदिर सातवाहन काळात बांधले गेले असावे, असे सांगितले जाते. तिकोना आणि तुंग किल्ल्यावर जाताना शिवाजी महाराज या मंदिराला भेट देत असत. स्वयंभू शिवलिंगाचे हे मंदिर वर्षातून केवळ चार महिने भाविकांसाठी खुले असते. इतर दिवशी ते पूर्णपणे पाण्याखाली असते. उन्हाळ्यात धरण क्षेत्रातील पाणी उतरल्यानंतर या दर्शनात भाविक दर्शनासाठी जातात. सध्या हे मंदिर पाण्याखाली आहे.





