करोनाचे नियम पाळून साजरी होणार शिवजयंती

पिंपरी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. शासनाच्या करोना संदर्भातील नियमावलीचे पालन करून या वर्षी शिवजयंतीचे कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यासाठी महापालिका प्रभावी नियोजन करेल, असे महापौर माई ढोरे यांनी सांगितले. शहरातील शिवरायांच्या पुतळ्याची रंगरंगोटी, त्या ठिकाणची स्थापत्य, विद्युत आणि सुशोभिकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश ही महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार नियोजन करण्यासाठी शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत शुक्रवारी (दि. 29) महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.

या बैठकीस उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्या आरती चोंधे, झामाबाई बारणे, निर्मला कुटे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, क्रीडा विभागाचे उपआयुक्त संदीप खोत, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे उपस्थित होते.

तसेच वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र तायडे, प्रवीण ढसाळ, संतोष जोगदंड, मराठा सेवा संघाचे भरत रणसिंग, शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे, निलेश शिंदे, सागर तापकीर, नकुल भोईर, शिवस्मारक प्रतिष्ठानचे सुरेंद्र पासलकर, छावा संघटनेचे धनाजी पाटील, राजेंद्र चेडे, बारा बलुतेदार महासंघाचे विशाल जाधव, भारतीय लहुजी पॅंथरचे युवराज दाखले, सचिन लिमकर, जनकल्याण प्रतिष्ठानचे अजय पाताडे आदी उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी शिवजयंती विचार प्रबोधन पर्वाच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या. शालेय स्तरावर शिवरायांच्या विचारावर आधारित निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे वेळेत नियोजन करावे, शिवकार्याचा प्रचार, प्रसार करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात यावा आदी सूचना केल्या.
माई ढोरे म्हणाल्या की, शासनाच्या करोना संदर्भात असलेल्या विविध नियमांची अंमलबजावणी केली जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.