मंचर : आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचा आमदार नसतानाही मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने मिळविलेले यश हे कार्यकर्त्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी उत्साहवर्धक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, दि. २३ रोजी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर लवकरच मंचर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांचे आभार मानणार असल्याची माहिती माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली. मुंबई येथे मंचर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे, जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर, मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजश्री दत्ता गांजाळे तसेच नगरसेवक विकास जाधव, लक्ष्मण पारधी, अन्सारी शेख, अरुण बाणखेले, सुप्रिया राजगुरव, बाजीराव मोरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचरच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. “मंचर शहराच्या विकासकामांसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही. आमदार पक्षाचा नसतानाही शिवसेनेच्या माध्यमातून नगराध्यक्षपद मिळवून देणे हे कार्यकर्त्यांचे मोठे यश आहे,” असे त्यांनी सांगितले. विरोधकांची ताकद मोठी असतानाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत विरोधकांना पराभूत केल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. मंचर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन आणि पक्ष पातळीवर पूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. शिवसेनेच्या या विजयामुळे मंचर शहराच्या राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.