शिवसेनेचा ‘हा’ नेता आता ईडीच्या रडारवर ;भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मोठा खुलासा

मुंबई : मागील काही दिवसांपासुन शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीच्या नोटीस आणि चौकशीचे फेरे सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एका शिवसेनेच्या बड्या नेत्यावर ईडीची कारवाई करण्यात येणार असल्याचा मोठा खुलासा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे थेट नाव घेत आरोप केले. अडसूळांची तक्रार रिझर्व्ह बॅंकेकडे करणार असल्याचेही सोमय्यांनी सांगितले.
सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. “बॅंकिंग क्षेत्रात जे खूप मोठ्या बाता करतात, त्यांच्याकडे पीएमसी बँकेचे पैसे पोहोचले आहेत. काही महिन्यांपूर्वी सिटी बॅंकेचे गुंतवणूकदार आले होते, आनंदराव अडसूळ यांचा विषय पुढे लावून धरणार. पीएमसी बॅंक असो किंवा सिटी बॅंक, दोषींवर कारवाई होणार” असा इशारा सोमय्यांनी दिला. आनंदराव अडसूळांबद्दल आम्ही रिझर्व्ह बॅंकेला कळवणार आहोत, असेही सोमय्या यावेळी म्हणाले.
“घोटाळे त्यांनी केले आणि आरोप आमच्यावर करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 हजार खातेधारांचे पैसे ढापले. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा घोटाळा किती कोटींचा आहे, हे लवकरच समजेल. संजय राऊतांचा चेहरा पाहिल्यानंतर आता बस्स करा असंच वाटले. ठाकरे कुटुंबाला भीती वाटते, त्यामुळे सामनाची भाषा बदलली. आता कोरोनाची बात करत आहेत. शिवसेनेचे अवस्था दयनीय आहे” असा घणाघातही सोमय्यांनी केला.





