Satara | कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उबाठाचा दावा

कोरेगाव, (प्रतिनिधी) – विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेससह आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील दावा केला आहे.
महायुतीला विशेष करुन शिंदेसेनेला लढत द्यायची असेल तर शिवसेना उबाठा पक्षाला जागा सोडलीच पाहिजे, अशी जोरदार मागणी निष्ठावंत शिवसैनिकांनी केली आहे. या मतदारसंघातून माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
दत्ताजीराव बर्गे यांनी सोमवारी संपर्क दौर्यास सातार्यातील बॉंबे रेस्टॉरंट चौकातून सकाळी ११ वाजता शिवसैनिकांच्या उपस्थितीत शुभारंभ केला. कोरेगाव उपतालुकाप्रमुख सदानंद शेडगे, त्रिपुटी येथील शाखाप्रमुख महेंद्र काटकर यांच्यासह जुने निष्ठावंत शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत सैनिक म्हणून दत्ताजीराव बर्गे यांची विशेष ओळख आहे. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी बर्गे यांना विशेष स्थान असून, त्यांनी बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबरोबरीने आजवर काम केले आहे.
कोरेगाव मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांना मानणारा मतदार आहे, त्यांना अपेक्षित असा मतदारसंघाचा विकास झाला नसल्याने या निवडणुकीत उतरणार आहे. फक्त मातोश्रीच्या आर्शिवादाची वाट पाहत असल्याचे बर्गे यांनी नमूद केले.
माजी आमदार दगडूदादा सपकाळ, संपर्क नेते आमदार भास्कर जाधव आणि उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उबाठाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात आहे.
कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्यात गाव तेथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार केला जाणार असून, तशी मोहीम आखली असल्याचे बर्गे यांनी सांगितले. यावेळी तानाजी सपकाळ, संजय वाघ, उदय घोरपडे, अतुल जगताप, अनिरुध्द कदम, सयाजीराव बुधावले यांच्यासह निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.





