मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरासह उपनगरांमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशीच घाटकोपरमध्ये मोठा गोंधळ उडाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पैसे वाटपाच्या आरोपावरून वाद घाटकोपर परिसरात शिंदे गटाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. याच मुद्द्यावरून दोन्ही गटांतील कार्यकर्ते आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिंदे गटावर गुन्हे दाखल या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेनंतर शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या घटनेबाबत शिंदे गटाचे माजी नगरसेवक हारुन खान यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. हारुन खान यांचे गंभीर आरोप हारुन खान यांनी आरोप करत म्हटले आहे की, “ठाकरे गटाचे पदाधिकारी इम्रान शेख यांनी बाहेरून गुंड आणले होते. या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल असून हत्येप्रकरणातही त्यांचा सहभाग आहे. इम्रान शेख यांचे गुंडांसोबतचे फोटोही उपलब्ध आहेत. कालची संपूर्ण घटना त्यांनीच घडवून आणली आहे.” ठाकरे गटाचे प्रत्युत्तर शिंदे गटाच्या आरोपांना ठाकरे गटाचे पदाधिकारी इम्रान शेख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. उलट शिंदे गटाचे हारुन खान परिसरातील नागरिकांना धमकावत आहेत. ‘आम्हाला मतदान केलं नाही तर घर पाडू, पाणी तोडू’ अशा धमक्या दिल्या जात आहेत.” राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मतदानाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आता या आरोप-प्रत्यारोपांवर शिंदे आणि ठाकरे गटाकडून पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.