Shiv Sena (UBT) : राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणे, हे सरकार म्हणून तुमचे अपयश : शिवसेना उबाठाचा हल्लाबोल

सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता विविध गोष्टींवर टीका करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राज्यात लाडकी बहिण योजना आणली. मात्र, त्याच योजनेत आता अनेक अटी लावून राज्यातील ५० लाडक्या बहिणी नावडत्या होणार असल्याचा हल्लाबोल शिवसेनकडून करण्यात आला आहे. तसेच राज्यातील विद्यमान राज्यकर्त्यांचा बुरखा रोजच टराटरा फाटतो आहे. मग संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण असो, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्ना असोत, राज्यातील कायदा सुवस्था असो असे एक प्रश्नांचा घेराव घालत शिवसेना उबाठाकडून हल्लाबोल करण्यात आला.
देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री तपास सुरू आहे, कोणालाही सोडणार नाही, हेच डमरु वाजवीत आहेत, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशात लाडक्या बहिणींचा वाटा आहे, पण लाडक्या बहिणींच्या योजनेत निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग त्यांनी सुरू केले आहेत. यामुळे सुमारे ५० लाख लाडक्या बहिणी नावडत्या होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. निकषांत न बसणाऱ्या बहिणींना अपात्र ठरवून त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकारजमा करून सावकारीला सुरूवात झाली आहे, असा खोचक टोला देखील लगावण्यात आला आहे.
तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने घोषणांचा पाऊस पाडला. लाडक्या बहिणींपासून ते शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेतकरी कर्जमाफी देणार म्हणजे देणारच, असा भाव भाजपने जाहीरनाम्यात आणला होता. तुमचा तो आव आता कुठे गेला असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. जाहीरनाम्यात सांगायचे कर्जमाफी देऊ आणि सत्तेत आल्यावर हात वर करायचे. राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणे हे सरकार म्हणून तुमचे अपयश आहे. त्याचे खापर लाडक्या बहिणींवर का फोडता आहात ? असा सवाल देखील करण्यात आला आहे.




