खालापूर – खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. परिवर्तन आघाडीतून शिवसेना ठाकरे गट आता पूर्णपणे बाहेर पडला आहे. आघाडीत जागावाटपातील तिढा, अंतर्गत मतभेद आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शेकाप पक्षाच्या वागणुकीबद्दल नाराजी यामुळे ठाकरे गटाने ११ नगरसेवक पदांवर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सुनील पाटील यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचे मानले जात आहे. शिवसेना उबाठा पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार नसल्यामुळे दोन दिवसात कोणत्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, हे कळवू तसेच परिवर्तन विकास आघाडीतील उमेदवारांना उबाठा पक्षाच्या नेत्यांचे फोटो, चिन्ह, झेंडे वापरले तर गुन्हा दाखल करू असा इशारा शिवसेनेने दिला आहे. माथेरान, कर्जत आणि खोपोली नगरपालिकांसाठी राष्ट्रवादी (अजित गट), शिवसेना (उबाठा) आणि शेकापने मिळून परिवर्तन आघाडी स्थापन केली होती. खोपोलीमध्ये शिवसेनेने १२ जागांची मागणी केली होती, परंतु केवळ तीन जागा दिल्या गेल्या. सोबतच या तीन जागांवरही राष्ट्रवादी आणि शेकापने प्रतिस्पर्धी उमेदवार उभे केले, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही जागावाटपाचा तिढा सुटला नाही, तसेच कोणतीही चर्चा झाली नाही, त्यामुळे विश्वासघात झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. शिवसेनेचा आक्रमक सूर खोपोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, शहर प्रमुख अंकुश पवाली यांच्यासह सर्व ११ अधिकृत उमेदवारांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना एकनाथ पिंगळे म्हणाले की, राष्ट्रवादीने आमचा विश्वासघात केला. त्यामुळे आघाडीची बैठक आणि प्रचारात आम्ही हजर राहिलो नाही. आमचे चिन्ह, झेंडे वापरले तर गुन्हा दाखल करू. तसेच नितीन सावंत यांनीही स्वबळाचा नारा देत सांगितले की, आमच्या पक्षाचे ११ उमेदवार उभे आहेत. पक्ष त्यांच्या मागे खंबीर उभा आहे. नगराध्यक्षपदासाठी कोणाला पाठींबा द्यायचा ते लवकरच जाहीर करू. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, शहर प्रमुख अंकुश पवाली, जगदीश ठाकरे, पंढरीनाथ राऊत, अनिता पाटील, सुविधा विचारे आदी प्रमुखांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्योती देशमुख, संजय सोळंकी, अनिल शेलार, माधवी पुरी, कीर्ती ओसवाल, अंकिता शीद, सुरेखा खेडकर, तन्वी रुपवते, जयश्री चालके, नितीन पवार, रोहिणी नायकोडे उपस्थित होते.