डोंबिवली : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेना (उबठा) चे कल्याण जिल्हाध्यक्ष व तरुण चेहरा दीपेश म्हात्रे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात धडक प्रवेश केला. याच सोहळ्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष केने यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले. विशेष बाब म्हणजे, एकनाथ शिंदे गटात गेलेले माजी नगरसेविका पूजा म्हात्रे व माजी नगरसेवक दयानंद गायकवाड यांनीही शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिमखाना मैदानावर झालेल्या या भव्यदिव्य पक्षप्रवेश सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष उसळला होता. कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार कपिल पाटील, आमदार शिल्पा गायकवाड, जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी आमदार नरेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दीपेश म्हात्रे यांचा राजकीय प्रवास गेल्या दोन वर्षांत शिवसेना, शिंदे गट, उबठा गट, आता भाजप असा चक्राकार फिरला आहे. तरीही स्थानिक पातळीवर त्यांची कार्यकर्त्यांशी असलेली अतूट नाळ आणि संघटन कौशल्य यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले. प्रवेशानंतर दीपेश म्हात्रे म्हणाले, “डोंबिवलीच्या विकासाशिवाय माझ्या आयुष्याला दुसरा अर्थ नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर खरंच काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पक्षासोबत राहण्यासाठी मी भाजपमध्ये आलो. आता डोंबिवलीला नवी ऊर्जा व नवे काम देण्याची वेळ आली आहे.” भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, “दीपेश म्हात्रेंची युवकांमध्ये प्रचंड पकड आहे. त्यांच्या येण्याने डोंबिवलीत भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक महापौर देणार आहोत. महायुतीत कुणाचा महापौर हे लवकर सांगता येणार नाही, पण जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही.”