विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचं नाव ‘निश्चित’

मुंबई: विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तसे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता. शिवसेना उबाठा पक्षाचे 20, काँग्रेसचे 16 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार निवडून आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वबळावर मिळण्याचे संख्याबळ कोणत्याही एका पक्षाला नाही. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद रिक्त राहणार का? अशी चर्चा सुरु झाली होती.
त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर त्यासाठी उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांचे नावंही चर्चेत होते. पण, ठाकरे विरोधी पक्षनेते होणार नसल्याचे आता स्पष्ट झालेय आहे. महाविकास आघाडीने त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले आहे. आता या नावाला मंजुरी द्यायची की नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे.
भास्कर जाधव (वय 67) यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. जाधव यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात नगरविकास, वन, बंदरे, विधीमंडळ कामकाज, क्रीडा, युवक कल्याण यासह वेगवेगळी मंत्रिपदे भूषविली आहेत. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत परतलेले जाधव एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही ठाकरेंसोबतच राहिले. ते या निवडणुकीत कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत.
दरम्यान, विधानसभेच्या अर्थसंकल्पयीय अधिवेशनाला सोमवारपासून (3 मार्च) सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून लावून धरली होती. विरोधकांच्या या मागणीला यश आले असतानाच त्यांना नेता मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





